गुजरातमधील जुनागड येथे हृदय पिळवटून टाकणारी घडली आहे. आंघोळ टाळण्याच्या प्रयत्नात एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. आईने नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बोलावलं असता चिमुकला एका कारमध्ये जाऊन लपला. पण त्यानंतर त्याला कारमधून बाहेर पडता न आल्याने गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य रवींद्र भारती असं मृत पावलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. बुधवारी सकाळी आदित्यच्या आईने त्याला आंघोळीसाठी बोलावलं. पण त्याला आंघोळ करायला आवडत नसल्याने त्याने घरातून पळ काढला आणि घराजवळील कारखान्यामध्ये पार्क केलेल्या कारमध्ये आश्रय घेतला. पण पुढच्याच क्षणी कारचा दरवाजा बंद झाला आणि आदित्य कारमध्ये अडकला.
हेही वाचा- लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
मुलगा घरातून गायब झाल्याने पालकांनी खूप शोधाशोध केली. पण आदित्यचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता कारखान्यातील एका कारमध्ये आदित्य लपून बसल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पालकांनी आदित्यला गाडीतून बाहेर काढलं, पण तो बेशुद्ध पडला होता.
पालकांनी त्याला तातडीने जुनागढ येथील रुग्णालयात दाखल केलं. पण त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला राजकोट येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. येथील डॉक्टरांनी आदित्यचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलं नाही. डॉक्टरांनी आदित्यचा मृत्यू गुदमरून झाल्याचं घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.