विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू झालेल्या छत्तीसगढमधील दंतेवाडा भागात भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न पोलीसांनी गुरुवारी उधळून लावला. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुरुवारी छत्तीसगढमध्ये वेगवेगळ्या भागात प्रचारसभा घेणार आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेदेखील गुरुवारी छत्तीसगढच्या दौऱयावर येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पोलीसांनी दंतेवाडा जिल्ह्यातील रस्त्यावर पेरण्यात आलेले ५० किलोच्या आयईडीचा वापर करण्यात आलेले दोन भूसुरूंग निकामी केले. केंद्रीय राखीव पोलीस दर आणि छत्तीसगढमधील स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
दोरनापाल ते जागरगुंडा या रस्त्यावर प्रत्येकी २५ किलो वजनाचे दोन आयईडी स्टीलच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. पोलीस या भागाची पाहणी करीत असताना त्यांना हे दोन आयईडी आढळले. त्यांनी तातडीने ते दोन्ही निकामी केले. २०१० साली नक्षलवाद्यांनी याच ठिकाणी पोलीसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये ७६ पोलीस मृत्युमुखी पडले होते.

Story img Loader