मागील काही दिवसांत देशाच्या विविध भागातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मंगळवारी दिल्लीत जवळपास ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राजस्थानातून येणारे उष्ण वारे आणि कडक उन्हामुळे तापमानात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानाचा फटका सर्व सामान्यांनाही बसतो आहे. अशातच आता उष्णतेमुळे बिहारमधील ५० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे पुढं आलं आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, वाढत्या उष्णतेमुळे बिहारमधील विविध शाळेतील ५० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात सरदार रुग्णालयाचे डॉ. रजनिकांत कुमार यांनी माहिती दिली. बिहारमधील वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती ठीक आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – दिल्लीत सूर्यदेव कोपला? ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी!
याशिवाय अन्य एका शाळेचे मुख्यध्यापक सुरेश प्रसाद म्हणाले, वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. आज प्रार्थना सुरू असताना आमच्या शाळेतील ६ ते ७ विद्यार्थी अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल केलं आहे. पुढे बोलताना, विद्यार्थ्यांनी जास्त वेळ उन्हात फिरू नये आणि जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावं अशी सुचनाही त्यांनी केली.
विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर टीका
दरम्यान, यावरून आता बिहारमधील राजकारणही तापू लागलं आहे. यामुद्द्यावरून विरोधकांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. बिहारमध्ये सरकार अस्तित्वात नाही. राज्यात सध्या प्रशासनराज सुरू आहे. तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ४७ अंशापर्यंत तापमान पोहोचलं आहे. सर्वसामान्यांना याचा त्रास होतो आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना याच काहीही पडलेलं नाही. ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत. वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ बदलवावी, अशी मागणी होते आहे. मात्र, याकडे लक्ष्य द्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
बिहारमधील परिस्थिती काय?
बिहारमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. मंगळवारी राज्यात ९ जिह्यातील तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. यापैकी सर्वाधिक तापमान बिहारच्या औरंगाबादमध्ये नोंदवण्यात आलं आहे, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी आशिष कुमार यांनी दिली. तसेच बिहारमध्ये यंदाचा उन्हाळा सर्वात उष्ण असून ही उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहील, असंही त्यांनी सांगितलं.