पाकिस्तानात ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार असून या निवडणुकांवर तालिबान आणि अन्य दहशतवादी गटांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे सावट असल्याने पाकिस्तान लष्कराने देशभरात ५० हजार सैनिक तैनात करण्याचे ठरविले आहे.
जनदुल्लाह, लष्कर-ए-जांगवी, तेहरिक-ए-तालिबान या बंदी घालण्यात आलेल्या संघटनांनी बलुचिस्तान प्रांतात विशेषत: क्वेट्टा आणि नुश्की येथे मोठे हल्ले करण्याची योजना आखली असल्याचा इशारा पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दिला आहे. पेशावरमधील महत्त्वाच्या शासकीय इमारती आणि ठाण्यांवर आत्मघातकी आणि बॉम्बहल्ले करण्याची योजना तालिबानने आखली असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे.
पंजाबमधील खानेवाल, मुलतान आणि अन्य ठिकाणी आदिवासी पट्टय़ातील तालिबान्यांनी हल्ले करण्याची योजना आखली आहे, असे सूत्रांचा हवाला देत ‘डॉन’ वृत्तपत्राने म्हटले आहे.
अंतर्गत मंत्रालयाचे अधिकारी आणि निवडणूक आयोग यांच्यात झालेल्या बैठकीच्या वेळी संभाव्य हल्ल्यांवर प्रकाशझोत टाकणारे सादरीकरण करण्यात आले.
त्यानंतर निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी ५० हजार सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाचे सचिव इश्तियाक अहमद यांनी रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयास दोनदा भेट दिली आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा