अनेक राजकीय सभा, रॅली आणि आंदोलनाची साक्ष असलेल्या दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांसाठी रामलीला मैदान भगवा गड आणि दिल्ली भाजपाचे कँप ऑफिस राहणार आहे. आज रविवारपासून पुढील ३ आठवड्यापर्यंत रामलीला मैदानावर भाजपाने मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज रविवारपासून भाजपाने दलित समाजाला आकर्षित करण्यााठी ‘भीम महासंगम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत एकाच भांड्यात ५००० किलो खिचडी तयार केली जाणार आहे. या मार्फत सामजिक समानतेचा संदेश देण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. ही खिचडी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर तयार करणार आहेत.

या खिचडीसाठी तीन लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरुन तांदूळ आणि डाळ आणली आहे. थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीद्वारे भाजप एकाच वेळी सर्वात जास्त खिचडी शिजवण्याचा विश्वविक्रम करणार आहे. सध्या ९१८ किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. भाजपा आता हा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

या रॅलीला दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी, महासचिव रामलाल, थावरचंद गहलोतसह अन्य नेते सहभागी होणार आहेत. नागपूरमधील शेफ विष्णू मनोहर आणि त्यांची टीम या समरसता रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यांची टीम खिचडी शिजवण्याचे काम करणार आहे. या रॅलीत 50 हजार लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या खिचडीसाठी खास भांडे तयार करण्यात आले आहे.

Story img Loader