नवी दिल्ली : भारतात आलेले ५०९ पाकिस्तानी नागरिक शुक्रवारपासून तीन दिवसांमध्ये अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात परतले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी १२ प्रवर्गातील अल्पमुदतीच्या व्हिसाधारकांना देश सोडून जाण्यासाठी दिलेली मुदत रविवारी संपली.
याबरोबरच पाकिस्तानात गेलेले ७४५ भारतीय नागरिक पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मायदेशी परतले आहेत. त्यामध्ये १४ राजनैतिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जायला सांगितले होते. त्यानुसार, सार्क व्हिसा असलेल्यांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडून जाण्यास सांगण्यात आले, वैद्याकीय व्हिसावरील नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत परत जायचे आहे तर १२ प्रवर्गातील व्हिसाधारकांसाठी रविवारची मुदत होती. त्यात आगमनानंतर व्हिसा, व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, परिषद, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, यात्रेकरू आणि गट यात्रेकरू यांचा समावेश आहे.
दीर्घ मुदतीचा व्हिसा, राजनैतिक किंवा अधिकाऱ्यांसाठी व्हिसा असणाऱ्यांना देश सोडून जाण्याच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, अल्पमुदतीच्या व्हिसावरील सर्वाधिक १,००० पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत. तसेच जवळपास ५,०५० पाकिस्तानी नागरिक दीर्घमुदतीच्या व्हिसावर राज्यात राहत आहेत.