आंध्र प्रदेश, ओडिशा या दोन राज्यात जोरदार पावसाने आलेल्या पुरात ५१ तर दक्षिण बंगालमध्ये तीन जण मृत्युमुखी पडले. कोलकाता येथेही पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. ओडिशात चार दिवसातील पावसाने १६ जण मरण पावले असून तेथील नद्यांची पातळी आता ओसरत असली तरी पूर परिस्थिती बिकट आहे. आंध्र प्रदेशात गेल्या चार दिवसात जोरदार पावसाने २९ जणांचा बळी घेतला असून एकूण ७२ हजार लोकांना सखल भागातून हलवण्यात आले आङे. पावसाच्या या तडाख्यातून आंध्रला सुटका मिळण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी नाही, कारण हवामान अंदाजानुसार ४८ तास अशाच प्रकारे जोरदार पाऊस चालू राहील.
आपत्ती व्यवस्थापन आयुक्त कार्यालयाच्या निवेदनानुसार ७२ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. एकूण ९ जिल्ह्य़ात हे लोक सखल भागात पुराच्या पाण्यात अडकले होते. एकूण ६५९७ घरे वाहून गेली असून ५.६४ लाख हेक्टर जमिनीवरील पीक वाहून गेले आहे. आंध्र प्रदेशात अनेक खेडी पाण्याखाली गेली असून रेल्वेमार्गही उखडले गेले आहेत. एकूण २९ जणांनी पुरामुळे प्राण गमावले असून प्रकाशम जिल्हयात सर्वाधिक सहा लोक मरण पावले आहेत.गुंटूरमध्ये ५, महबूबनगरमध्ये४, हैदराबाद, कुर्नुल येथे प्रत्येकी तीन, विजयनगरम, पूर्व गोदावरी, नलगोंडा व वारंगळ येथे प्रत्येकी दोन जणांनी प्राण गमावले आहेत. विशाखापट्टनम जिल्ह्य़ात दोन जण बेपत्ता झाले आहेत.
मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मृतांच्या नातेवाइकांना सानुग्रह मदत वितरित करण्यास सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी महसूल मंत्री रघुवीरा रेड्डी यांना गुंटूर जिल्ह्य़ात बापटला या गावाचा दौरा करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी, मुख्य सचिव पी.के.मोहंती व इतर वरिष्ठ अधिकारी मदतकार्यावर देखरेख करीत आहेत. विशेष पथके स्थापन करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याचे अंदाज घेतले जात आहेत. १६ जिल्ह्य़ातील ३२३० गावांना या पावसाचा फटका बसला आहे, असे आपत्ती व्यवस्थापन आयुक्त टी.राधा यांनी सांगितले.४०५ छोटे पाटबंधारे व ९३५ कि.मी. लांबीचे रस्ते वाहून गेले आहेत.  कृष्णा जिल्ह्य़ात पुराच्या धोक्याचा इशारा दिला आहे.