आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी विशाखापट्टणम सज्ज
भारतीय नौदलातर्फे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी ५३ देशांच्या ९० युद्धनौका येथील नौदल बंदरात दाखल झाल्या आहेत. भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा, आयएनएस सुमेधा, आयएनएस शरयू, आयएनएस सुनयना या चार गस्तीनौकांचा ताफा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
संचलनासाठीची रंगीत तालीम बुधवारी विशाखापट्टणम बंदरापासून आतमध्ये खोल समुद्रात पार पडली. एकूण ९० युद्धनौका, सहा रांगांमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष ६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी या युद्धनौका याच रचनेमध्ये उभ्या असतील. सध्या येथे येऊन दाखल झालेल्या नौदलांमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, ओमान, श्रीलंका, बांगलादेश, ब्राझील, मालदिव, मॉरिशस व ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश आहे. अमेरिकेचे नौदल १० हजार टन वजनाच्या मिसाईल गायडेड क्रूझर युद्धनौकेसह दाखल झाले आहे.
विराट व विक्रमादित्य प्रथमच एकत्र
भारतीय नौदलातील दोन्ही विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विराट या निमित्ताने प्रथमच एकत्र पाहायला मिळतील. याशिवाय कोलकाता वर्गातील अद्ययावत स्टेल्थ विनाशिका, दिल्ली वर्गातील विनाशिका, स्टेल्थ फ्रिगेटस्, मिसाईल कॉव्र्हेटस्, पाणबुडीविरोधी युद्धनौका, जमिनीलगत कारवाई करणाऱ्या शार्दुल वर्गातील लँिडग युद्धनौकांबरोबरच किलो व सिंधुघोष वर्गातील पाणबुड्याही आयएफआर मध्ये भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करतील.