HeatWave in Uttar Pradesh : जूनची १५ तारीख उलटून गेल्यानंतरही पावसाने ओढ दिली आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याने हवामानात उष्णता कायम आहे. भारतातील अनेक राज्ये अद्यापही उष्णतेच्या ज्वाळा सहन करत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी उष्माघाताचे बळी जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेचे ५४ बळी गेले आहेत. गेल्या तीन दिवसांतील ही आकडेवारी असून तब्बल ४०० जण रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही समोर आले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत वाढत्या तापामानामुळे ५४ जणांचा मृत्यू झाला असून ४०० जणांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूची कारणे वेगवेगळी असली तरीही तीव्र उष्माघात हे महत्त्वाचं कारण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तीव्र उष्णतेमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. तिथे जवळपास ४०-४३ अंश सेल्सिअस तापमान आहे.
हेही वाचा >> भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात फेकले; हिमाचल प्रदेशमध्ये तणाव
ताप, श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर समस्यांमुळे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात गर्दी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरही ताण निर्माण झाला आहे. रुग्णालयात स्ट्रेचरी कमतरता असल्याने अनेक कर्मचारी रुग्णांना खांद्यावरून घेऊन जात आहेत.
१५ जून रोजी २३ जणांचा मृत्यू झाला होत, १६ जून रोजी २० जणांचा मृत्यू झाला, तर १७ जून रोजी ११ जण दगावले, अशी माहिती बलिया जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक एस.के. यादव यांनी दिली.
आझमगड सर्कलचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. बी. पी तिवारी यांनी सांगितले की, “या आजारामागचे कारण शोधण्याकरता लखनौहून एक पथक येत आहे. वातावरणात प्रचंड उष्मा किंवा गारवा असतो तेव्हा श्वसनाचे विकार होतात. याचा सर्वाधिक धोका मधुमेह आणि उच्चरक्तदाब रुग्णांना असतो. त्यामुळे वातावरणात अधिक उष्णता निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा.”
हेही वाचा >> मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, भाजप नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न
जिल्हा रुग्णालयात एवढी गर्दी आहे की रुग्णांना स्ट्रेचर मिळेनासे झाले असून अनेक कर्मचारी रुग्णांना खांद्यावर घेऊन आपत्कालीन वॉर्डात जात आहेत. परिणाीम, एकाचवेळी दहा रुग्ण दाखल होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य संचालकांनी दिली.