इम्फाळ : वांशिक हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरमध्ये शनिवारी आणखी पाच जणांना गोळय़ा घालण्यात आल्याने तेथील दंगलबळींची संख्या ५४ वर पोहोचली आहे. चुराचंदपूर या हिंसाचारग्रस्त जिल्ह्यात संरक्षण दलाचे जवान मैतेई नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित करीत असताना दंगलखोरांनी चौघांना गोळय़ा घालून ठार केले, तर आणखी एकाचा इम्फाळमध्ये मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चुराचंदपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये पाच बंडखोर ठार झाले, तर इंडिया रिझव्‍‌र्ह बटालियनचे दोन जवान जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, इम्फाळ खोऱ्यातील जनजीवन शनिवारी काहीसे सुरळीत झाल्याचे दिसत होते. दुकाने पुन्हा उघडली होती. बाजारपेठांमधील वर्दळ वाढली होती. रस्त्यांवर वाहनेही धावताना दिसत होती. हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या ५४ झाल्याची माहिती सरकारी अधिकारी देत असले तरी अनधिकृत सूत्रांच्या मते ही संख्या  याहून अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर हिंसाचारात जखमी झालेल्या दीडशेहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत.

हिंसाचारग्रस्त भागातील सर्व महत्त्वाचे रस्ते आणि भागांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त असल्याने तेथे शनिवारी तणावपूर्ण शांतता होती. मणिपूरमधून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांसह लोक मोठय़ा संख्येत इम्फाळ विमानतळावर जमले होते.

राज्यात बहुसंख्याक असलेल्या मैतेइ समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरुद्ध कुकी आणि नागा या आदिवासी जमातींनी आंदोलन केल्यानंतर हिंसाचार उसळला. त्यानंतर राज्यात लष्कर, निमलष्करी दल आणि केंद्रीय पोलीस दल यांचे मिळून सुमारे १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

१३ हजार नागरिक सुरक्षितस्थळी

आतापर्यंत एकूण १३ हजार लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लष्कराने चुराचंदपूर, मोरे, काकचिंग आणि कांगपोक्पी जिल्हे आपल्या संपूर्ण नियंत्रणाखाली आणले आहेत. काही नागरिकांना लष्करी तळांवर आश्रय देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 54 dead in manipur violence imphal valley returning to normalcy zws