एपी, बैरुत

लेबनॉननस्थित हेजबोला या बंडखोर गटाने केलेल्या हल्ल्यांना विरोध करताना इस्रायलने लेबनॉनवर दोन दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. त्यामध्ये लक्षणीय प्राणहानी झाली आहे. या संघर्षात दुर्बल झालेला हेजबोला गट पूर्ण शक्तीनिशी इस्रायलला उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाझा पट्टीपुरते मर्यादित असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बैरुतजवळ पुन्हा केलेल्या हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर ठार झाल्याचे इस्रायलने मंगळवारी सांगितले.

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला चढवला. ते युद्ध सुरू असताना लेबनॉनस्थित आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हेजबोला गट आणि इस्रायलदरम्यान लहानमोठ्या चकमकी सुरू राहिल्या.गेल्या आठवड्यात इस्रायलने हजारो पेजर व वॉकीटॉकींचे स्फोट घडवून आणल्याने लेबनॉनमध्ये हजारो लोक जखमी झाले.

हेही वाचा >>>“छोट्या गुंतवणूकदारांचे १.८ लाख कोटी रुपये लुटणारे…”; राहुल गांधींचा पुन्हा सेबीवर हल्लाबोल; म्हणाले…

दोन दिवसांत मोठी प्राणहानी

इस्रायलने हेजबोलाला लक्ष्य करत सोमवारी पहाटेपासून लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यांमधील मृतांची संख्या ५५८ झाली आहे. मृतांमध्ये ५० लहान मुले आणि ९४ महिलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनॉनचे आरोग्यमंत्री फिरास अबियाद यांनी मंगळवारी दिली.