पीटीआय, नवी दिल्ली
जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात बुधवारी पाच वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान झाले. सहा जिल्ह्यांतील २६ मतदारसंघांत २३९ उमेदवार रिंगणात आहेत. पाच वाजेपर्यंत जम्मू विभागातील श्री माता वैष्णो देवी मतदारसंघात सर्वाधिक ७५.२९ टक्के मतदान झाले. पाठोपाठ पूंछ हवेली मतदारसंघात ७२.७१, गुलबर्गमध्ये ७२.१९ टक्के तर सुरनकोटमध्ये ७२.१८ टक्के मतदारांनी हक्क बजावला.

काश्मीर खोऱ्यातील १५ मतदारसंघांपैकी खानासाहेबमध्ये सर्वाधिक ६७ टक्के मतदान झाले. हब्बाकडल मतदारसंघात सर्वात कमी १५.८० टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबरला मतदान होईल. तर हरियाणासह जम्मू व काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होईल.

हेही वाचा >>>कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह प्रकरणी पुन्हा नवी तारीख; ३० सप्टेंबर रोजी होणार पुढील सुनावणी

दरम्यान, काश्मीरमधील विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी अमेरिका, नॉर्वे, सिंगापूर आदींसह १६ देशांमधील निरीक्षक उपस्थित आहेत. त्यांनी बडगम जिल्ह्यातील ओंपोरा विभागात भेट दिली. निवडणूक अधिकारी अक्षय लाब्रो यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर या मुद्द्यावर टीका केली आहे. ही निवडणूक देशाचा अंतर्गत विषय असताना परदेशी प्रतिनिधींना आमंत्रण देण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला. परदेशी नागरिकांना तपासणी कशासाठी करून द्यायची? अशी विचारणा अब्दुल्लांनी केली.

राज्याच्या दर्जासाठी दबावराहुल गांधी

जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणू असे आश्वासन विरोधी पक्षनेेते राहुल गांधी यांनी सोपोर येथील प्रचारसभेत दिले. राज्याचा दर्जा हिरावून केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे हा येथील जनतेवर अन्याय आहे, असेही ते म्हणाले.