नेपाळला शनिवारी तब्बल ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपातील मृतांचा आकडा ४५० वर पोहचल्याची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेतर्फे मिळत आहे. ८१ वर्षांनंतर प्रथमच नेपाळला इतक्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती, काठमांडूचे पोलीस उपमहानिरीक्षक कमल सिंग बाम यांनी दिली. भूकंपाच्या या तीव्र धक्क्यात शहरातील अनेक इमारतींसह युनेस्कोने जागतिक हेरिटेजचा दर्जा दिलेला काठमांडुतील दरबार स्क्वेअर जमीनदोस्त झाला.
भारतामध्ये दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाची तीव्रता जाणवली. तब्बल तीन ते चार मिनिटापर्यंत उत्तर भारतातील झारखंड, छत्तीसगढ, हरयाणा, राजस्थान या भागांत भूकंपाचे हादरे बसत होते. पहिला धक्का ११ वाजून४१ मिनिटांनी, तर १२ वाजून १९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. दिल्लीला बसलेल्या भूकंपाच्या दुसऱ्या धक्क्याची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी होती.
सध्याच्या माहितीनूसार, नेपाळमध्ये पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मृतांचा आकडा ४४९वर पोहचला आहे. नेपाळ आणि काठमांडू भागात सर्वाधिक नुकसान झाले असून या ठिकाणची अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच दळणवळण आणि संपर्क यंत्रणा ठप्प झाल्यामुळे मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. तर भारतामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बिहारमधील १४ जणांचा समावेश आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात घराचे छप्पर कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर बाराबंकी येथे एका आई आणि मुलीला प्राण गमवावा लागला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथील रूग्णालयात सध्या मोठ्याप्रमाणवर जखमींना भरती केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा