लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी चौथ्या टप्प्याचे मतदान झाले. ५९ विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान झाले असून एकूण ५९.७७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी सहा वाजता मतदान समाप्त झाले. सकाळी मतदानाचा टक्का कमी होता. मात्र त्यानंतर मतदान वाढत गेले. पिलभित, लखमीपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाओ, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर सिक्री जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये मतदान झाले असून ६२४ उमेदवार या ठिकणी निवडणुकीला उभे आहेत.
मणिपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातील २६६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर बुधवारी फेरमतदान झाले. या मतदान केंद्रावर तब्बल ७३.६७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मात्र २६६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर अयोग्य मतदान झाले असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी केली होती. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने बुधवारी फेरमतदान घेतले.
लखनऊमध्ये बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, मत्री ब्रिजेश पाठक यांनी मतदानाचा हक्क बजावला. लखीमपूर खेरी येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. तिथे ६५.५४ टक्के मतदान झाले आहे.
२०१७च्या विधानसभा निवडणुकीत या ५९ मतदारसंघांपैकी ५१ मतदासंघांवर भाजपने वर्चस्व मिळवले होते. समाजवादी पक्षाला चार, बहुजन समाज पक्षाला तीन आणि अपना दल या पक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता.