Vasanthy Cheruveetil Trekked to Everest Base Camp : केरळमधील एका ५९ वर्षीय महिलेने जगातील सर्वाच उंच एव्हरेस्ट हे शिखर सर केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यासाठीचं कोणतंही अधिकृत प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्यांनी केवळ यूट्युबवरील व्हिडीओ पाहून स्वतःची तयारी केली होती. वासंती चेरुवीत्तील असं या महिलेचं नाव आहे. इंटरनेटवरील माहिती व यूट्युबवरील व्हिडीओ पाहून घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे केलेली तयारी, हिंमत आणि ५९ वर्षीसुद्धा कायम असणाऱ्या उत्साहाच्या जोरावर त्यांनी जगातलं सर्वात उंच शिखर सर केलं आहे. एव्हरेस्टवर चढाई करण्याचं त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न होतं जे त्यांनी पूर्ण केलं आहे.
एव्हरेस्ट हे शिखर सर करणं तरुणांसाठी देखील खूप अवघड ठरतं. त्यासाठी अनेकजण प्रशिक्षणही घेतात. मात्र, ५९ व्या वर्षी, कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही कामगिरी करणं खूपच कौतुकास्पद आहे. एव्हरेस्टवर गिर्यारोहण करण्यासाठी वासंती यांनी स्वतःला पूर्णपणे सज्ज केलं होतं. गिर्यारोहणाशी संबंधित व्हिडीओ पाहून तयारी केली होती.
यूट्युबवरील व्हिडीओ पाहून तयारी केली
वासंती यांनी १५ फेब्रुवारी रोजी चढाईला सुरुवात केली होती. नेपाळमधील सुर्के येथून त्यांनी त्यांची मोहीम सुरू केली. २३ फेब्रुवारी रोजी त्या बेस कॅम्पवर दाखल झाल्या. ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी ५९ वर्षीय वासंती यांनी केवळ यूट्युबवरील व्हिडीओ पाहून तयारी केली होती.
माझ्या मित्रांचा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता : वासंती चेरुवीत्तील
मल्याळम मनोरमाने दिलेल्या वृत्तानुसार थलिप्परमबाइन येथील ५९ वर्षीय वासंती यांनी इंटरनेटवर उपलब्ध माहिती, यूट्युबवरील व्हिडीओ पाहून प्रशिक्षण घेतलं. त्या म्हणाल्या, “मी दररोज सकाळी तीन तास चालायचे, ट्रेकिंग शूज परिधान करून बराच वेळ सराव करायचे. माझ्या मित्रांबरोबर संध्याकाळी ५ ते ६ तास चालायचे. मी जेव्हा माझ्या मित्रांना सांगितलं की मला एव्हरेस्ट शिखर सर करायचं आहे म्हणून मी हा सराव करतेय, तेव्हा माझ्या मित्रांना यावर विश्वास बसायचा नाही.
काय म्हणाल्या वासंती चेरुवीत्तील?
एव्हरेस्ट प्रवासादरम्यान वासंती या जगभरातील अनेक गिर्यारोहकांना भेटल्या. चढाई करताना अनेक अडथळे येत होते, निमुळत्या वाटा, खोल दऱ्यांसह अनेक अडचणी बाजूला करून त्या दररोज पाच ते सहा तास चढाई करत होत्या. बऱ्याचदा मोठी विश्रांती घ्यायच्या. याबाबत वासंती यांनी सांगितलं की “मला जास्त वेळ हवा होता. मी बऱ्याचदा हळू चालायचे, माझ्याबरोबरचे लोक पुढे जायचे. मी मोठी विश्रांती घ्यायचे. माझ्याकडे एक छडी होती, मला तिचाच आधार होता. काही पावलं चालल्यानंतर मी थांबायचे पाच ते सहा वेळा श्वास घ्यायचे. जेणेकरून मला कमी थकवा येईल.”