5G Spectrum Auction Reliance Jio, Bharti Airtel, Vi Prepare Battle : देशात फाईव्ह जी (5G) स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी अशा चार कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या फेरीत लिलावात सहभागी कंपन्यांनी थंड प्रतिसाद दाखवला आहे. आता लिलावाच्या दुसऱ्या फेरीतच स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया पूर्ण व्हायला किती वेळ लागणार हे अस्पष्ट आहे.

फाईव्ह जी (5G) स्पेक्ट्रमच्या लिलावात एकूण ४.३ लाख कोटी रुपये मुल्याचे ७२ गिगाहर्ट्ज स्पेक्ट्रमसाठी बोली लावली जाणार आहे. बोलीची प्रक्रिया मंगळवारी (२६ जुलै) सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत असणार आहे. मात्र, हा लिलाव दोन दिवसांपर्यंत चालण्याची शक्यता आहे. हे सर्वस्वी बोली लावणाऱ्यांवर अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या लिलावात इतर कंपन्यांसोबत उद्योगपती गौतम अदानी यांची अदानी एंटरप्रायजेस देखील सहभागी आहे.

अतिवेगवान ५ जी ध्वनिलहरींच्या या लिलावात सहभागी होण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील या आघाडीच्या कंपन्यांना सरकारकडे अग्रिम ठेव रक्कम (Deposit amount) जमा करावी लागते.

कुणीची किती अग्रिम ठेव रक्कम?

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील आघाडीच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ५जी लिलावात सहभागी होण्यापूर्वी १४,००० कोटी रुपयांची अग्रिम ठेव (ईएमडी) सादर केली आहे. त्यापाठोपाठ भारती एअरटेलने ५,५०० कोटी रुपये, तर कर्जजर्जर असलेल्या व्होडाफोन-आयडियाने २,२०० कोटी रुपये जमा केले आहेत. तर यंदा लिलावामध्ये पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने १०० कोटी रुपये रक्कम जमा केली आहे. दूरसंचार कंपन्यांकडून लिलावाआधी जमा करण्यात येणाऱ्या ठेवीच्या रकमेवरून त्यांची रणनीती आणि ध्वनिलहरी खरेदी योजना याबाबत संकेत मिळतात. तसेच कंपन्यांना पात्रता बिंदूदेखील दिले जातात, ज्याद्वारे दूरसंचार कंपन्या विशिष्ट ध्वनिलहरींच्या खरेदीसाठी पात्र असतात.

हेही वाचा : एका रिचार्जमध्ये ३ सिम चालणार आणि मिळणार १५० जीबीपर्यंत डेटा, जाणून घ्या Jio-Airtel चे प्लान

या लिलावात वीस वर्षांच्या कालावधीसाठी ४.३ लाख कोटी रुपयांच्या एकूण ७२,०९७.८५ मेगाहट्र्झ ध्वनिलहरी उपलब्ध करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने एकूण नऊ ध्वनिलहरींचा लिलाव करण्याची योजना आखली आहे.

Story img Loader