निकारग्वाला ६.२ रिस्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा तडाखा बसून त्यामध्ये एक जण ठार, तर ३३ जण जखमी झाले असून ८०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
निकारग्वाला गुरुवारी भूकंपाचा तडाखा बसल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डॅनिअल ओर्टेगा यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात होता.
भूकंपाच्या या तडाख्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असून जनतेमध्ये घबराट पसरली आहे. भूकंपाचा धक्का बसल्याने एका ३७ वर्षांच्या महिलेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे सूत्रांनी सांगितले.
भूकंपात ३३ जण जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भूकंपामुळे जवळपास ८०० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत.