करोनाच्या दृष्टचक्रातून अवघं जग हळूहळू बाहेर पडत असताना एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. करोनातून बरे झालेल्या ज्या रुग्णांना पोस्ट कोविडचा त्रास झाला त्यांच्या मृत्यूची शक्यता तीन पटीने वाढली असल्याचा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) काढला आहे. तसंच, करोनाची लागण झालेल्या ६.५ टक्के मध्यम ते गंभीर रुग्णांचा वर्षभरात मृत्यू झाल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. ३१ रुग्णालयांमधील १४ हजार ४१९ रुग्णांच्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या रुग्णांवर वर्षभर फोनद्वारे देखरेख ठेवली गेली होती. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पोस्ट कोविड त्रास
सप्टेंबर २०२० पासून रुग्णालयात दाखल झालेल्या १७.१ टक्के रुग्णांना पोस्ट कोविडचा त्रास झाला आहे. करोनातून बरे झाल्यानंतर चार आठवड्यात थकवा, श्वास घेण्यास अडचण, धाप लागणे, एकाग्रता मंदावणे अशी लक्षणे आढळल्यास पोस्ट कोविडची स्थिती निर्माण होते.
या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० वर्षांवरील पुरुषांमध्ये वर्षभरात मृत्यूचा धोका जास्त होता. तसंच, पोस्ट कोविडच्या फॉलोअपवेळी ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता त्यांच्यात मृत्यूचा धोका ४० टक्क्यांनी कमी झाला होता.
हेही वाचा >> बलात्कार पीडितेला सर्वोच्च न्यायालयाकडून गर्भपाताची परवानगी; न्यायमूर्ती म्हणाले, “अविवाहित असताना…”
सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांची काळजी आवश्यक
दरम्यान, हा अभ्यास मध्यम ते गंभीर स्वरुपाच्या रुग्णांच्या मृत्यूशी संबंधित आहे. ज्यांना अल्प स्वरुपाचा संसर्ग झाला आहे त्यांना हा निष्कर्ष लागू होणार नाही, असं आयसीएमआरशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, करोनासह इतर आजार असलेल्या (सहव्याधी) रुग्णांमध्ये कोविड मृत्यूचा धोका संभवतो. याचा अर्थ यकृत सिरोसिस आणि किडनीच्या आजाराच्या लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गामुळे दीर्घकाळ जळजळ, अनेक अवयवांचे नुकसान, फुफ्फुसाचे बिघडलेले कार्य यामुळे हे मृत्यू झाले असावेत असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
नव्या व्हेरियंटमुळे धास्ती
करोना संसर्ग हळूहळू हद्दपार होतोय असं वाटत असतानाच नव्या व्हेरियंटची जगाची चिंता वाढवली आहे. EG.5 हा नवा कोरोनाचा प्रकार आढळळा असून ५० हून अधिक देशांमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. तर, BA.2.86 या प्रकाराचेही रुग्ण चार देशांमध्ये नोंदवले गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनी सोमवारी उच्चस्तरीय कोविड-१९ आढावा बैठक घेतली. “सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने सज्ज राहिले पाहिजे आणि राज्यांना इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांचे निरीक्षण करा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांशू पंत यांनी बैठकीत दिले.