चीनच्या वायव्येकडील गांसू प्रातांला सोमवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या धक्क्यांमुळे ५४ जणांचा बळी गेला असून, ३०० नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने ही माहिती दिली. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी होती.
स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणेआठ वाजता भूकंपाचे धक्के जाणवू लागले. गांसू प्रातातील मिनझिआन आणि झॅगझिआन या दोन्ही भागांमध्ये भूकंपाची तीव्रता जास्त होती, असे वेधशाळेने म्हटले आहे. बीडॅओ शहरापासून १५१ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे अनेक इमारतींना नुकसान पोहोचले असून, काही ठिकाणी भिंतींना मोठे चिरे पडले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.