पीटीआय, शिमला
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात गुरुद्वारा मणिकर्ण साहिबजवळ रविवारी भूस्खलनानंतर एक मोठे झाड अनेक वाहनांवर कोसळले. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. वादळ आणि भूस्खलनामुळे गुरुद्वारासमोरील डोंगरावरील एक झाड उन्मळून पडले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत तीन नागरिक जखमी झाले आहेत. झाड ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी काही विक्रेते आणि वाहने उभी होती.
मृतांमध्ये बंगळुरूमधील एक पर्यटक आणि दोन स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे, तर इतर तिघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कुल्लूचे उपविभागीय दंडाधिकारी विकास शुक्ला यांनी दिली.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना कुल्लू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.