राजस्थानच्या पाली जिल्ह्यात रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाला असून २० भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

हेही वाचा- मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी; २ भाविक ठार, अनेक जखमी

६ भाविकांचा जागीच मृत्यू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीतून जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. समोरून येणाऱ्या दुसऱ्या भरघाव ट्रॉलीने ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, या घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना शिवपूर आणि सुमेरपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व भाविक गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून शोक व्यक्त

पंतप्रधान कार्यालयाने या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएमओच्यावतीने याबाबत ट्वीट करण्यात आले आहे. राजस्थानमधील पाली येथे झालेला अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खाच्या प्रसंगी आमच्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमी भाविक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा- SFI नव्हे काँग्रेस कार्यकर्त्यांनीच महात्मा गांधींचा फोटो तोडला, राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणाला वेगळं वळण

मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे ट्वीट

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. पाली जिल्ह्यातील रामदेवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या अनेक भाविकांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी दुःखद आहे. या दु:खात मृतांच्या आत्म्यास शांती आणि शोकाकुल कुटुंबीयांना बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Story img Loader