वयात येणाऱया मुलींची छेडछाड आणि त्यांच्यावर होणाऱया शारीरिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील सहा गावांतील गावकऱयांनी त्यांच्या घरातील मुलींना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतलाय. सोमवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे या गावांतील सुमारे ४०० मुलींचे शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे.
हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यातील सहा गावांतील गावकऱयांनी पंचायतीमध्ये गेल्या शुक्रवारी हा निर्णय घेतला. पाल, गदानिया, खेर्की, निहालवास, कुक्सी आणि पलाह या गावातील गावकऱयांची एकत्रित पंचायत पाल गावामध्ये झाली. त्यावेळी मुलींना शाळेत न पाठविण्यावर सर्वांचेच एकमत झाले.
सहा मे रोजी गावातील दोन मुली शाळेतून घरी परतत असताना काही तरुणांनी त्यांची छेड काढली. एका मुलीने त्यांना प्रतिकार केल्यानंतर ते सर्वजण तिथून पळून गेले. या घटनेनंतर गावकऱयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, तसेच पंचायतीमध्येसुद्धा हा मुद्दा उपस्थित केला.
गावातील पोलिस आणि शाळाचालक मुलीच्या सुरक्षिततेची हमी घेण्यास तयार नाहीत. छेडछाड करणाऱयांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळेच मुलींना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे पंचायतीचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलिस उपाधीक्षक अमरसिंग यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 haryana villages decide not to send girls to school to avoid harassment
Show comments