वायव्य पाकिस्तानमधील पेशावर शहरातील एका मशिदीत शनिवारी दुपारी शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होऊन आतापर्यंत सहा जण मरण पावल्याचे वृत्त हाती आले आहे. या स्फोटात मशिदीतील ३० जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पेशावर येथील अत्यंत अशांत टापू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना बाजार येथे ही मशीद आहे. दुपारी एकच्या सुमारास अत्यंत गजबजलेल्या भागातील या मशिदीत शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला. या वेळी या मशिदीत ३० उपासक होते तर मशिदीबाहेर गजबजलेल्या मार्केटमध्ये लहान मुले, महिलांसह अनेकांची गर्दी होती.
या स्फोटात आतापर्यंत सहा जण मरण पावले असून अन्य ३० जण जखमी झाल्याचे लेडी रीडिंग रुग्णालयातील सूत्रांनी म्हटले आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मशिदीतील उपासक नमाज अदा करत असतानाच हा स्फोट झाला, असे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले असून स्फोटामुळे सीसी टीव्ही फुटेजमध्ये स्फोटानंतर मशिदीत मोठा खड्डा निर्माण झाल्याचे तसेच लगतच्या काही भिंती कोसळून काही भिंतींमध्ये खिळे रुतले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
अरुंद गल्ल्या व गजबजाटामुळे मदत पथकाला घटनास्थळी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. येथे झालेल्या स्फोटानंतर मीना बाजार व लगतच्या परिसरातील दुकाने तातडीने बंद करण्यात आली.
वायव्य पाकिस्तानातील खैबर-पख्तूनवा प्रांत तसेच पेशावर परिसरातील काही भागांना गेल्या काही दिवसांपासून अनेक स्फोटांना सामोरे जावे लागले आहे. शनिवारी झालेल्या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नसली तरी आतापर्यंत झालेले बॉम्बस्फोट पाहता पाकिस्तानातील तेहरिक-ए-तालिबान या प्रतिबंधित संघटनेचेच हे कृत्य असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
येथील प्रांतीय मुख्यमंत्री अमीर हैदर खान होती हे मोटरगाडय़ांच्या ताफ्यातून जात असताना अलकडेच एका आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यातून बचावले होते. मे महिन्यात या ठिकाणी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता या भागातील सुरक्षाव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा