मुहर्रममधील अशूरानिमित्त पाकिस्तानातील शिया समाजाने डेरा इस्माइल खान येथे काढलेल्या मिरवणुकीवर पाकिस्तानी तालिबान्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात सहाजण ठार तर ९० जण जखमी झाले. खैबर पख्तुनवाला प्रांतात शिया समाजावरील हा दुसरा हल्ला आहे. एका दुकानात हा बॉम्ब ठेवला गेला होता. या दुकानाजवळून भाविकांची मिरवणूक जात असताना दूरनियंत्रण यंत्राद्वारे या बॉम्बचा स्फोट घडविला गेला.
मृतांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे तर जखमींमध्येही चार पोलिसांचा समावेश आहे. अनेक महिला व मुले या स्फोटात जखमी झाली आहेत. शनिवारीही याच भागात शियांच्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात आठजण ठार तर २० जखमी झाले होते. बुधवारी रावळपिंडीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २३ जण ठार तर ६० जखमी झाले होते. तहरिक ए तालिबान या पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या संघटनेने या सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

Story img Loader