तेलंगणा आणि छ्त्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात सोमवारी पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. या चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भद्राद्री कोठागुडेमचे एसपी सुनील दत्त यांनी सांगितले की, तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील किस्ताराम पीएस सीमेवरील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले. ऑपरेशन अजूनही सुरू आहे, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
ही घटना सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. तेलंगणाच्या ग्रेहाऊंड सैन्याने ही आंतरराज्यीय संयुक्त कारवाई केली. छत्तीसगडच्या डीआरजी आणि सीआरपीएफ दलांनी मदत पुरवली. पोलिसांनी सांगितले की नक्षलवादी चेरला एरिया कमिटीचे होते आणि मृतांमध्ये एका वरिष्ठ नेत्याचाही समावेश असू शकतो.
सर्व नक्षलवाद्यांची ओळख बाकी –
एसपीने सांगितले की, त्यांना नक्षलवाद्यांचा एक गट पेसलपाडू भागात तळ ठोकल्याची माहिती मिळाली होती. द इंडियन एक्सप्रेसनुसार, एसपी म्हणाले की, ‘माहिती अशी मिळाली होती की, ते पोलिसांवर हल्ला करण्यासाठी आयईडी तयार करत होते. छत्तीसगड आणि तेलंगणा ग्रेहाऊंड्सने संयुक्त ऑपरेशन सुरू केले आणि नक्षलवाद्यांच्या गटाशी चकमक सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान झाली. यात किमान सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांची ओळख पटणे अद्याप बाकी आहे.