उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात सोमवारी सकाळी मालमत्तेच्या वादातून दोन कुटुंबातील सहा जणांची निर्घुण हत्या झाली आहे. रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फतेहपूर गावात हा रक्तंजित संहार घडला असून येथे मोठा पोलीस फौजफाटा आणि पीएसीची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांचा सत्यप्रकाश दुबे यांच्यासोबत मालमत्तेवरून वाद होता. दोघेही एकाच परिसरात राहत होते. सकाळी ९ च्या सुमारास प्रेम यादव हे सत्यप्रकाश यांच्या घरी आले. त्यांच्यात सुरुवातीला वाद झाला. वादाचं रुपांतर मारहाणीत झालं.
एकाच्या हत्येमुळे केली पाच जणांची हत्या
या मारहाणीत प्रेम यादव यांची हत्या झाली. प्रेम यादव यांच्या हत्येची माहिती गावात पसरताच अनेक यादव समर्थक सत्यप्रकाशच्या घरी आले. त्यांनी बदला म्हणून सत्यप्रकाश दुबे यांची हत्या केली. तसंच, त्यांच्या घरातील चार जणांवरही हल्ला केला. परिणामी, सत्यप्रकाश दुबे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय या हल्ल्यात मृत झाले. मृतांमध्ये एक महिला, दोन मुलींचा समावेश आहे, अशी माहिती देवरियाचे पोलीस अधिक्षक संकल्प शर्मा यांंनी दिली.
हेही वाचा >> GPS ने भरकटवलं, मुसळधार पावसात नदीत बुडाली गाडी; तरुण डॉक्टरांचा करुण अंत
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहा मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनाकरता रुग्णालयात नेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून आरोपींना पकडण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्या सहा जणांची नावे काय?
प्रेम यादव, सत्यपाल दुबे (५४), त्यांची पत्नी किरण दुबे (५२), मुलगी सलोनी दुबे (१८), नंदीनी (१०) आणि मुलगा (१५) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा दुसरा मुलगा अनमोल हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.