शनिवारी अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारची धांदल उडाली आहे. अफगाणिस्तानातील भूकंपात दोन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू आणि ९ हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती तालिबान प्रशासनाने रविवारी दिली.

शनिवारी अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस ३५ किलोमीटर (२० मैल) अंतरावर होता. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल असल्याचं यूएस भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) सांगितलं.

फेब्रुवारीमध्ये टर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात अंदाजे ५० हजार लोकांचा जीव गेला होता. हा आतापर्यंतचा जगातील सर्वाधिक प्राणघातक भूकंपापैकी एक होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंप झाला असून मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे.

हेही वाचा- “मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO

आपत्ती मंत्रालयाचे प्रवक्ते जनन सईक यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानमधील भूकंपात २०५३ लोकांचा मृत्यू झाला, तर ९२४० लोक जखमी झाले. तसेच १३२० घरांचं नुकसान झालं. रविवारी सकाळी ‘रेड क्रेसेंट’ने ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. आता मृतांचा आकडा वाढला आहे. इराणच्या सीमेला लागून असलेल्या भागात दहा बचाव पथके कार्यरत असल्याचंही सईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

हेही वाचा- “हमास दहशतवाद्यांकडून बलात्काराचा शस्त्रासारखा वापर”, अनेक महिला बेपत्ता झाल्यानंतर ‘इस्रायल वॉर रुम’कडून भीती व्यक्त

हेरात येथील रुग्णालयात २०० हून अधिक मृतांना आणण्यात आलं होतं. यामध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश होता, अशी माहिती हेरातच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. दानिश यांनी दिली. तसेच इतरही अनेक मृतदेह लष्करी तळ आणि विविध रुग्णालयात नेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Story img Loader