आपल्या आकाशगंगेत पूर्वी समजले जात होते त्यापेक्षा दुप्पट म्हणजे ६० अब्ज ग्रह वसाहतयोग्य असू शकतील, असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. हे सर्व ग्रह मातृताऱ्यांच्या वसाहतयोग्य क्षेत्रात म्हणजे गोल्डीलॉक झोनमध्ये येतात. त्यांचे या ताऱ्यांपासूनचे अंतर द्रव पाणी टिकवून ठेवण्याइतके आहे. नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे, की लाल बटू ताऱ्यांभोवती फिरणारे अनेक ग्रह हे वसाहतयोग्य असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाल बटू तारे हे विश्वात जास्त प्रमाणात आढळणारे तारे आहेत.
या सगळ्या बाबींचा विचार करता आपल्या आकाशगंगेतच लाल बटू ताऱ्यांभोवती फिरणारे किमान ६० अब्ज तारे वसाहत योग्य असतील. शिकागो विद्यापीठ व नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ यांच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात परग्रहावरील ढगांच्या गुणधर्म व वर्तनाची संगणकावर नक्कल करण्यात आली व त्याच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले.
नासाच्या केप्लर दुर्बिणीने गोळा केलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाल बटू ताऱ्याच्या वसाहतयोग्य क्षेत्रातील किमान एक तरी ग्रह हा पृथ्वीच्या आकाराइतका व जीवसृष्टी असण्याजोगा आहे. या लाल बटू ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांना ढगांचे आवरण आहे किंवा नाही याची चाचणी करण्याचे काही नवीन मार्गही यातून स्पष्ट झाले आहेत.
नॉर्थ वेस्टर्न सेंटर फॉर इंटरडिसीप्लिनरी एक्स्प्लोरेशन अँड रीसर्च इन अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेतील संशोधक निकोलस कोवान यांनी सांगितले, की आकाशगंगेतील अनेक लाल बटू ताऱ्यांभोवती हे ग्रह फिरत आहेत.

Story img Loader