Pakistan Terror Attack पाकिस्तानाच्या अशांत बलुचिस्तान प्रांतामध्ये पोलीस ठाणे, रेल्वेमार्ग आणि महामार्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेक्यांनी केलेले हल्ले आणि सुरक्षा दलांनी त्यांना दिलेले उत्तर यामध्ये ७० पेक्षा जास्त व्यक्ती ठार झाल्या अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. बलुचिस्तानमध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये झालेला हा सर्वात गंभीर अतिरेकी हल्ला असल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका घटनेत मुसाखेल जिल्ह्यामध्ये बंदूकधाऱ्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि त्यांचे परिचय तपासले. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक अयुब खोसो यांनी दिली. त्यामध्ये किमान २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी बहुसंख्य दक्षिण पंजाबमधील होते आणि काहीजण खैबर पख्तुनख्वा प्रांतातील होते, त्यामुळे वांशिक कारणारवरूनच त्यांची हत्या करण्यात आली असावी, असे खोसो यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Cow Meat Smuggling Suspect Died: …आणि जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ठेवली ओलीस, केली धक्काबुक्की; उत्तराखंडमध्ये गोमांस तस्करीच्या आरोपावरून जमाव संतप्त!

‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए) या अतिरेकी गटाने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी यापूर्वीही बलुचिस्तानात पंजाबी लोकांना लक्ष्य केले आहे. अन्य एका घटनेत, कलात जिल्ह्यामध्ये बंदूकधाऱ्यांनी चार पोलीस अधिकाऱ्यांसह १० जणांची हत्या केली. हत्याकांडांबरोबर अतिरेक्यांनी दळणवळणाच्या सुविधांनाही लक्ष्य केले. त्यांनी मुसाखेल महामार्गांवरील ट्रकसह ३५ वाहने पेटवली. या ट्रकमधून कोळशाची वाहतूक केली जात होती. क्वेट्टाला उर्वरित पाकिस्तानशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गावरील एक पूल स्फोटाद्वारे उडवून दिला. तसेच बलुचिस्तान ते इराणदरम्यानचा रेल्वेमार्गही उडवण्यात आला असे रेल्वेचे अधिकारी मुहम्मद काशिफ यांनी सांगितले.

शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेले हल्ल्यांचे सत्र रविवारी आणि सोमवारीही सुरू राहिले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये २१ अतिरेकी ठार झाल्याचे पाकिस्तानच्या लष्करातर्फे सांगण्यात आले. त्याशिवाय १४ सैनिक आणि पोलीसही कामी आले.

पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ, तसेच बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सर्फराज बुग्ती यांनी या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केल्याचे वृत्त तेथील माध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तानसाठी बलुचिस्तानचे महत्त्व

● नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रदेश

● चीनच्या पुढाकाराने अनेक प्रकल्पांची उभारणी

● प्रकल्पांमध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ग्वादार बंदर, सोने व तांब्याच्या खाणीचा समावेश

पाकिस्तानमध्ये अनागोंदी माजवण्यासाठी विचारपूर्वक योजना आखण्यात आली असून त्याअंतर्गत हे अतिरेकी हल्ले करण्यात आले आहेत. – मोहसीन नक्वी, गृहमंत्री, पाकिस्तान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60 killed after terrorist attacks in pakistan s balochistan zws