मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरुद्ध झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून १७०० घरे जाळण्यात आल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एस. बिरेन सिंह यांनी दिली आहे. तसेच मणिपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – Manipur Violence: “माझ्या धगधगत्या मणिपूरला वाचवा,” मेरी कोमवर भावनिक साद घालण्याची वेळ का आली? पाहा Video
काय म्हणाले मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह?
मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून २३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हिंसाचारादरम्यान १७०० घरे जाळण्यात आली असून आतापर्यंत २० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तर १० हजार नागरिक अद्यापही अडकले आहेत, अशी माहिती एस. बिरेन सिंह यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी मणिपूरमधील नागरिकांना शांततेचे आवाहनही केले. मणिपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कृपया शांतता राखावी, असे ते म्हणाले.
हेही वाचा – मणिपूरमध्ये हिंसाचार; आदिवासी-बिगर आदिवासींमध्ये संघर्षाचे कारण काय?
दरम्यान, या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली असून वांशिक हिंसाचाराचा फटका बसलेल्यांची सुरक्षा, तसेच मदत व पुनर्वसनाचे प्रयत्न वाढवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व मणिपूर सरकारला दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे इम्फाळ खोऱ्यातील काही भागांत जनजीवन सुरळीत झाले असून दुकाने पुन्हा उघडली आहेत. तसेच बाजारपेठांमधील वर्दळ वाढली आहे.