काबूल विमानतळावरील जवळजवळ सहा हजार जाणांना अमेरिकेच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी दिलीय. या सहा हजार जणांनी सर्व कागदोपत्री पूर्तता केली असून लवकरच त्यांना अमेरिकेमध्ये आणलं जाईल असं सांगण्यात आलंय. प्रवक्ते नेड प्रिन्स यांनी यासंदर्भात माहिती देताना काबूल विमानतळ परिसरामध्ये ५२०० अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आल्याचंही ते म्हणाले.

“आमच्या टीमने पूर्णपणे तपासणी केलेले आणि काबूलमधून हवाई मार्गाने बाहेर निघण्यास पात्र असणारे सहा हजार जण सध्या काबूल विमानतळावर आहेत. त्यांना लवकरच विमानाने हलवलं जाईल,” असं प्रिन्स म्हणाले. “अमेरिकेच्या सी-१७ एस या विमानाने १२ फेऱ्यांमध्ये पहिल्या २४ तासांमध्ये २००० जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. तर १४ ऑगस्टपासून एकूण ७००० जणांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलं आहे,” असं प्रिन्स म्हणाले.

विमानतळवरील गर्दीचा आपल्याला अंदाज असून आपण संरक्षण दलांच्या सहाकर्याने जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासंदर्भात आणि त्यासाठी आवश्यक ती मदत मिळावी म्हणून काम करत आहोत असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

काबूल विमानतळावरुन विमाने उड्डाण घेत राहतील असं सांगताना प्रिन्स यांनी अमेरिकन नागरिक आणि अधिकृतरित्या कायमचं नागरिकत्व मिळवलेल्या अमेरिकन नागरिकांना विमानामध्ये प्राधान्याने स्थान दिलं जाईल. तसेच अमेरिकेकडून विमानतळांवर अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. यामध्ये कतार आणि कुवैतचाही समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये काबूल विमानतळ वगळता बाहेर काम करण्यासंदर्भात आमच्याकडे कोणतीही साधनं नाहीत.

पेंटागनने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये आता काबूलमध्ये केवळ ५२०० लष्करी जवान तैनात आहेत. अमेरिकन लष्कराचे मेजर जनरल विल्यम टेलर यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती. “आता काबूलमधील ५२०० सैनिक एवढीच अमेरिकेची अफगाणिस्तानमधील उपस्थिती आहे. काबूल विमानतळ हे सुरक्षित असून तेथून विमान उड्डाणेही होत आहेत,” असं टेलर म्हणाले होते.

टेलर यांनी अफगाणिस्तानमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या नागिरकांची आकडेवारीही सांगितली होती. मदतकार्य सुरु झाल्यापासून म्हणजेच १४ ऑगस्ट पासून अमेरिकन यंत्रणांनी एकूण सात हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे असं टेलर म्हणाले. तर अफगाणिस्तान सोडून गेलेल्या लोकांची एकूण संख्या ही १२ हजारांच्या आसपास असल्याचंही टेलर यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक अमेरिकी नागरिकाचे स्थलांतर करेपर्यंत अमेरिकी फौजा अफगाणिस्तानात ठेवण्यास आपण बांधील आहोत; मग त्यासाठी ३१ ऑगस्ट या माघारीच्या मुदतीनंतरही तेथे सैन्य ठेवावे लागले तरी बेहत्तर, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी सांगितले.