पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एका मशिदीत सैनिक आणि पोलीस कर्मचारी नमाज अदा करीत असताना तालिबानी दहशतवाद्याने सोमवारी दुपारी घडवलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ६१ ठार, तर दिडशेहून अधिक जखमी झाले. मृत आणि जखमींमध्ये पोलिसांची संख्या अधिक आहे. 

कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या पोलीस वसाहत परिसरातील मशिदीत सोमवारी  नमाजासाठी नागरिक जमले असताना दुपारी १.४० वाजता तालिबानी आत्मघाती हल्लेखोराने हा बॉम्बस्फोट घडवला, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. मशिदीत पोलीस, सैनिक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाचे कर्मचारी दुपारचा नमाज अदा करत होते. यावेळी पुढच्या रांगेतील आत्मघाती हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवला, असेही सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉम्बस्फोटात मशिदीचा एक भाग कोसळला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. बॉम्बस्फोट झाला तेव्हा मशिदीत ३०० ते ४०० पोलीस उपस्थित होते. परंतु सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक झाल्याची कबुली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बॉम्बस्फोटात ४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असली तरी पेशावर पोलिसांनी मात्र ३८ मृतांची यादी जाहीर केली आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात मारल्या गेलेल्या आपल्या भावाचा सूड घेण्यासाठी हा आत्मघाती हल्ला करण्यात आला, असा दावा ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चा (टीटीपी) मारला गेलेला कमांडर उमर खालिद खुरासानीच्या भावाने केला.  ‘टीटीपी’ने  यापूर्वीही अनेक आत्मघाती हल्ले केले आहेत.

‘टीटीपी’चा हिंसाचार

या हिंसाचारामागे ‘अल-कायदा’शी जवळीक असलेल्या तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) हा गट असल्याचा  अंदाज आहे. या गटाने २००९ मध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. २००८ मध्ये इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासह अनेक हल्ल्यांमागे हाच गट होता. २०१४ मध्येही याच गटाने पेशावर शहरातील सैनिकी शाळेवर हल्ला केला होता. त्यात १३१ विद्यार्थ्यांसह १५० ठार झाले होते.

Story img Loader