रांची (झारखंड) : विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी ४३ मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. राज्यात सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी असा थेट सामना आहे. मतदान शांततेत पार पडले. लोहरडगा जिल्ह्यात सर्वाधिक ७३.२१ टक्के तर हजारीबाग जिल्ह्यात सर्वात कमी ५९.१३ टक्के मतदान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केले होते. नक्षलग्रस्त पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात मतदारांनी हे आवाहन धुडकावत मतदान केले. नक्षलवाद्यांनी मतदानात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र सुरक्षादलांनी ते हाणून पाडले. सरकारी योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे जमा झाल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. ‘झारखंड मुख्यमंत्री मैयन सन्मान योजनेच्या’निधीबाबत चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली. हा निधी दर महिन्याला सहा किंवा सात तारखेला जमा होतो, मग यंदा मतदानापूर्वीच कसा जमा केला? असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा >>> समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

झारखंडची प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न!

खोट्या प्रचाराच्या माध्यमातून भाजप राज्याची प्रतिमा दूषित करीत असल्याचा आरोप झारखंडचे मुख्यंमत्री हेमंत सोरेन यांनी भाजपवर केला. राज्यात झामुमोच्या नेतृत्वातील सरकारविरोधात प्रचार करण्यासाठी विविध समाजमाध्यमांवर भाजप कोट्यवधींचा खर्च करीत असून ९५,००० व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले असल्याचा दावादेखील सोरेन यांनी ‘एक्स’वर केला. या निवडणुकीत भाजपने झारखंडमध्ये कथित बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उचलून धरला आहे. दरम्यान, सोरेन यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव मान्य केला असल्याचा पलटवार भाजपने केला.

घुसखोरी चिंताजनक

झारखंडमधील घुसखोरीचा प्रकार चिंताजनक आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोड्डा येथील प्रचार सभेत केला. राज्य सरकार घुसखोरांना संरक्षण देत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यात पीम आवास योजनेऐवजी अबू आवास योजना राबवली जात असून, त्यात घोटाळा असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. राज्यातील घुसखोरीने बेटी, माती आणि रोटी यावर संकट आहे. झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस यांचे सरकार घोटाळ्यांमध्ये बुडाले आहे. पेपर फुटीने तरुणांची बेरोजगारी दूर झालेली नाही. आमचे सरकार पेपर फुटीतील गुन्हेगारांना शिक्षा ठोठावेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls zws