पीटीआय, काठमांडू
नेपाळमध्ये संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान ६६ जणांचा मृत्यू झाल्याचे शनिवारी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. शुक्रवारपासूनच्या संततधार पावसाने नेपाळचे अनेक भाग जलमय झाले आहेत. त्यामुळे येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
नेपाळ पोलीस दलाचे उप प्रवक्ते बिश्वो अधिकारी म्हणाले की, संततधार पावसामुळे ६६ जणांचा मृत्यू झाला. त्यात काठमांडू खोऱ्यातील ३४ मृतांचा समावेश आहे. या पुरात ६० जण जखमी झाले आहेत. ७९ जण बेपत्ता असून, एक हजारहून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. देशभरातील मुख्य महामार्गावरील ४४ ठिकाणे रोखण्यात आले आहेत. काठमांडूत २२६ घरे पुराच्या पाण्याखाली गेल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.