१५ आणि १६ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( एलएसी ) भारत आणि चीनी जवानांमध्ये झटापट झाली होती. यामध्ये भारताच्या एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय हवाई दलाने ६८ हजारांहून अधिक जवान आणि ९० रणगाडे आणि आणि अन्य शस्त्रे पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहचवली होती, अशी माहिती संरक्षण आणि सुरक्षा प्रतिष्ठानमधील सूत्रांनी दिली आहे.
भारतीय हवाई दलाच्या वाहतूक क्षमतेचा उल्लेख करत सूत्रांनी सांगितलं की, एका विशेष अभियानाअंतर्गत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवान आणि शस्त्रे फार कमी वेळेत पोहचवण्यात आली होती. तसेच, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाने रिमोट संचालित विमानेही ( आरपीए ) तैनात केली होती.
हेही वाचा : होय, हा हिमालय आहे! आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून सुलतान अल-नेयादी यांनी टिपलेलं विलोभनीय दृश्य
अनेक सीमाभागांवर वाद-विवाद सुरु आहे. त्यामुळे भारतीय लष्कर आणि हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हवाई दलाने लष्करातील विविध तुकड्यांना हवाई मार्गाने पोहचवलं होतं. ज्यात ६८ हजारांहून अधिक जवान, ९० रणगाडे, ३३० बीएमपी वाहने, रडार, तोफा आणि अन्य शस्त्रांचा समावेश होता.
दरम्यान, तीन वर्षापासून पूर्व लडाखमधील काही सीमारेषांवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये तणावाचं वातावरण राहिलं आहे. मात्र, दोन्ही देशांनी चर्चेनंतर अनेक ठिकाणांवरील सैन्य माघारी घेण्यात आलं.
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. आता नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचे ५० हजार ते ६० हजार जवान तैनात आहेत. भारत आणि चीनमध्ये आज ( १४ ऑगस्ट ) उच्चस्तरीय बैठक होणार आहे.