उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात गुरुवारी सकाळी मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर शालेय बसने वाराणसी-आझमगड पॅसेंजरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.
हाजिपूर येथील ‘डी. डी. कॉन्व्हेंट स्कूल’ची ही बस होती. शाळेत जात असताना सकाळी आठ वाजता या बसने महासो येथील राणीपूर भागात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर पॅसेंजर ट्रेनला धडक दिली. पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघात सकाळी झाला, त्या वेळी या बसमध्ये १५ विद्यार्थी होते.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख रुपये, तर किरकोळ जखमी झालेल्यांना २० हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे.
या अपघातानंतर मानवरहित रेल्वे क्रॉसिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहेत, असे प्रभू यांनी सांगितले. सध्या देशभरात ११ हजार मानवरहित रेल्वे क्रॉसिंग आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Story img Loader