केरळच्या वायनाड येथील एका अनाथ आश्रमात सात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरूणांच्या टोळक्याकडून या मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी तीनजणांचा पोलीस शोध घेत आहेत. अनाथ आश्रमाच्या सुरक्षारक्षकाने एका मुलीला जवळील एका दुकानातून बाहेर पडताना पाहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तरूणांचे एक टोळके आश्रमातील मुलींना आमिष दाखवून दुकानात बोलवत व या मुलींचे लैंगिक शोषण करत. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता.
Kerala: Six minors from an orphanage in Wayanad allegedly molested. Police have detained five people and registered case
— ANI (@ANI) March 7, 2017
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आश्रमाच्या चालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे काही मुले आश्रमातील शाळेत जाणाऱ्या मुलींना आमिष दाखवत. ही मुले या मुलींना चॉकलेट किंवा अन्य गोष्टींचे आमिष दाखवून जवळच्या दुकानामध्ये बोलवत. याठिकाणी आल्यानंतर हे तरुण मुलींना पॉर्न पाहायला लावत आणि त्यांचे लैंगिक शोषण करत. या प्रकाराची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही या मुलींना दिली जात असे. अत्याचार करण्यात आलेल्या मुली या सातवी, आठवी आणि नववी इयत्तेत शिकणाऱ्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत केवळ सात मुलींनीच पुढे येऊन तक्रार करण्याचे धाडस दाखवले आहे. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार आश्रमातील ३० मुली या अत्याचारांना बळी पडल्या आहेत. त्यामुळे आता या आश्रमातील मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक वैद्यकीय पथक सोमवारी रात्री आश्रमात पाठवण्यात आले होते.दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सहा तरूणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.