लहान मुलं उत्सुकतेपोटी आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांचे अनुकरण करत असतात. अनेकदा यामुळे दुर्घटनाही घडतात. बंगळुरू येथील एका सात वर्षीय चिमुकलीने टीव्हीवरील मालिकेचे अनुकरण करताना आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टीव्हीवरील कन्नड मालिकेचे अनुकरण करत पीडित मुलीने स्वत:ला पेटवून घेतल्याने तिचा मृत्यू झाला. ‘न्यूज १८’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दवानगेरे जिल्ह्याच्या हरिहारा भागातील आहे. याठिकाणी ११ नोव्हेंब रोजी प्रार्थना या मुलीचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांना हा सारा प्रकार २९ नोव्हेंबर रोजी कळाला. याबद्दल अधिक चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
प्रार्थना ही तिच्या घरी टीव्हीवर नंदिनी ही कन्नड मालिका पाहत होती. या मालिकेत मुख्य पात्र स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न करते, असे दाखवण्यात आले. हे दृश्य पाहून प्रार्थनाने त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि ती गंभीररित्या भाजली. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
प्रार्थना सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत होती. पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत. मात्र, प्रार्थनाने अन्य कुठल्या कारणामुळे हे कृत्य केले की केवळ मालिका पाहून तिने हे पेटवून घेतले, याचा तपास सुरू आहे.