हवा प्रदूषणामुळे २०१२ या वर्षांत ७० लाख लोक मरण पावले, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. हवा प्रदूषण हे घरात व घराबाहेर अशा दोन्ही ठिकाणी होत असते, त्यामुळे विकसित व विकसनशील देशात अनेक पर्यावरण समस्या निर्माण होतात. २०१२ मध्ये दर आठ जणांपकी एकाचा मृत्यू हा हवा प्रदूषणाने झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य संचालक मारिया नेइरा यांनी म्हटले आहे.
हवा प्रदूषणामुळे हृदयविकार, पक्षघात, फुफ्फुसाचे विकार, कर्करोग होत असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आग्नेय आशियात भारत-इंडोनेशिया व पश्चिम पॅसिफिकमध्ये चीन, दक्षिण कोरिया व जपान, फिलिपिन्स या देशांना हवा प्रदूषणाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. त्या देशांमध्ये ५९ लाख लोक प्रदूषणाने मरण पावले आहेत, त्यातील ४३ लाख मृत्यू हे घरातील प्रदूषणामुळे झाले आहेत.
त्यात कोळसा व लाकडे जाळणे व जैवभारावरील स्टोव्ह यांचा समावेश आहे. ३७ लाख मृत्यू हे बाहेरच्या प्रदूषणामुळे झाले आहेत, त्यात कोळसा व डिझेल इंजिनांचा समावेश आहे.
अनेक लोकांना घरात व घराबाहेर प्रदूषणाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही कारणामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ७० लाख आहे. २००८ मध्ये हवा प्रदूषणाने १३ लाख लोक बाहेरच्या प्रदूषणाने तर १९ लाख लोक घरातील प्रदूषणाने मरण पावले होते, त्यात वेगळी संशोधन पद्धती वापरली होती व आता वेगळी वापरली आहे.
उपग्रहाच्या सहाय्याने प्रदूषणाचा अभ्यास
त्यामुळे आताच्या व तेव्हाच्या आकडय़ांची सरसकट तुलना करता येणार नाही असे सांगण्यात आले. उपग्रह छायाचित्रांमुळे ग्रामीण भागातील प्रदूषणाचा अभ्यास करणे आता सोपे झाले आहे. अजूनही २.९ अब्ज घरांमध्ये स्वयंपाकासाठी चुली पेटवल्या जातात हे दुर्दैव आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे कॅरोलस डोरा यांच्या मते घरे ही भट्टय़ा बनली आहेत. निर्धूर चुली किंवा स्टोव्ह वापरणे हा त्याच्यावरचा उपाय आहे पण तो फार थोडे लोक वापरतात. जागतिक आरोग्य संघटना या वेळी जगातील पहिली १६०० प्रदूषित शहरे जाहीर करणार आहे. तुम्ही पाण्याप्रमाणे बाटलीत भरून स्वच्छ हवा घेतो असा दावा करू शकत नाही, असे कॅरोलस यांनी सांगितले.