Tax On IPL Tickets: यंदाच्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले असून, स्पर्धा आता मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही रंगतदार होत चालली आहे. अशात, नुकत्याच झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यातील तिकिटांबाबत एका एक्स युजरने मोठा दावा केला आहे.
या युजरने असे निदर्शनास आणून दिले की, हा सामना पाहण्यासाठी चेन्नई येथे गेलेल्या क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या तिकिटांवर ७० टक्क्यांहून अधिक कर भरला होता. या युजरच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत आहे. एक्सवर रवी हांडा या युजरने निदर्शनास आणून दिले की २,३४३ रुपये मूळ किंमत असलेले तिकीट कर भरल्यानंतर ४,००० रुपयांना विकले गेले.
“आयपीएल सामन्यांच्या तिकिटांवर कर ७०% पेक्षा जास्त आहे,” असे सोशल मीडिया युजर रवी हांडा यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, “२३४३.७५ रुपयांचे तिकीट कर भरल्यानंतर ४००० रुपयांचे होते.”
दरम्यना या पोस्टबरोबर रवी हंडा यांनी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यातील तिकिटाचा फोटो देखील एक्सवर शेअर केला आहे.
सीएसके-आरसीबी सामन्यात, जे लोअर स्टँडमध्ये एका व्यक्तीसाठी तिकिटाची किंमत ४,००० रुपये होती. तिकिटाच्या तपशीलांनुसार, मूळ किंमत २,३४३.७५ रुपये होती, ज्यामध्ये २५% मनोरंजन कर, १४% सी जीएसटी आणि १४% एस जीएसटी यासह अतिरिक्त कर आकारण्यात आला होता.
पोस्टमध्ये, रवी हंडा यांनी असेही नमूद केले आहे की, त्यांना हे तिकीट शिरीषा या सोशल मीडिया युजरने पाठवले होते. त्या युजरने हा प्रकार “करदात्यांची थट्टा” असल्याचे म्हटले आहे.
यामध्ये सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएलच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर भरते कारण ते भारताच्या आयकर कायद्याच्या कलम १२अ अंतर्गत “धर्मादाय संस्था” म्हणून नोंदणीकृत आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
एका सोशल मीडिया युजरने यावर प्रतिक्रिया देणारी पोस्ट केली आणि लिहिले, “तामिळनाडूमध्ये आयपीएल तिकिटांच्या मूळ किमतीवर (करानंतर) २५% मनोरंजन कर १४ वर्षांपासून आकारला जात आहे.”
दरम्यान या एक्सवरील पोस्टच्या प्रतिक्रिया रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही उमटत आहेत. एका रेडिट युजरने स्पष्ट केले की, “सध्याच्या कायद्यानुसार, हे पूर्णपणे योग्य आहे. अनेक राज्यांनी मनोरंजन कर रद्द केला आहे. मात्र काही राज्ये अजूनही तो आकारतात.”
ही एक चैनीची गोष्ट
“आयपीएल तिकिट खरेदी करणे ही एक चैनीची गोष्ट आहे, आणि म्हणून तुम्हाला जास्त कर भरावा लागत आहे. मान्य करतो की, मनोरंजन कर आकारला जातो, परंतु तो फक्त राज्य सरकार आकारते,” असे आणखी एका युजरने म्हटले.