युक्रेनच्या आग्नेयेकडील सुमी शहरातून स्थलांतरित करण्यात आलेल्या सुमारे ७०० भारतीय विद्यार्थ्यांचा अखेरचा मोठा गट पोल्तावा येथून एका विशेष रेल्वेगाडीत बसला असून, हे विद्यार्थी गुरुवारी पोलंड येथून विमानाने भारतासाठी रवाना होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही रेल्वेगाडी या विद्यार्थ्यांना पश्चिम युक्रेनमधील ल्यिव येथे नेणार असून, तेथून त्यांना बसगाडय़ांतून पोलंडला नेण्यात येईल, असे अर्शद अली या विद्यार्थी समन्वयकाने सांगितले. पोल्तावा आणि ल्यिव यांच्यातील अंतर सुमारे ८८८ किलोमीटर आहे.

वेढल्या गेलेल्या सुमी शहरातील दोन आठवडय़ांच्या कष्टप्रद वास्तव्यानंतर, युक्रेनमध्ये शेकडो मैल अंतर कापून आणि वाहतुकीच्या निरनिराळय़ा साधनांचा उपयोग करून या विद्यार्थ्यांना युद्धग्रस्त युक्रेनमधून स्थलांतरित करण्यात येत आहे.

अडकून पडलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याकरता भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत अतिशय नाजुक व आव्हानात्मक अशी मोहीम राबवत आहे.

सुमीतील मोहिमेला मंगळवारी सकाळी सुरुवात होऊन, सुमारे ७०० भारतीय विद्यार्थ्यांच्या अखेरच्या मोठय़ा गटाला या शहरातून हलवण्यात आले. भारतीय नागरिकांना १३ बसगाडय़ांच्या ताफ्यातून आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या संरक्षणात पोल्तावा शहरात नेण्यात आल्याची माहिती अर्शद अली याने दिली.

युद्धग्रस्त भागातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना खडतर प्रवासाचा सामना करावा लागत आहे. रशियाने गेल्या महिन्यात युक्रेनवर आक्रमण केल्यापसून तोफगोळय़ांचा जोरदार मारा व गोळीबार होत असलेल्या सुमी शहरातून विद्यार्थ्यना हलवण्याचा हा दुसरा प्रयत्न होता.