गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास ७०० तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती करण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या केंद्रशासित प्रदेशात १४१ सक्रिय दहशतवादी आहेत, त्यापैकी बहुतेक दहशतवादी परदेशी असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

या सहा महिन्यात ६९ तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भर्ती

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै २०२२ पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ८२ विदेशी आणि ५९ स्थानिक दहशतवादी सक्रिय होते. हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा, त्याची संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील आहेत. विविध दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू काश्मीरमधील ७०० स्थानिक तरुणांची भरती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये १८७, २०१९ मध्ये १२१, २०२० मध्ये १८१ आणि २०२१ मध्ये १४२ तरुणांची भरती करण्यात आली होती. या वर्षी जून अखेरपर्यंत ६९ तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती केली आहे.

हेही वाचा- “सैन्यात असंतुष्ट मुलं गेली तर…”; अग्निपथवरून मेघालयच्या राज्यपालांचे मोदी सरकारवर टीकास्र

जम्मू काश्मीरमध्ये आठ ग्रेनेड हल्ले

सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत ५५ चकमकीत १२५ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यावर्षी दहशतवादी घटनांमध्ये आतापर्यंत दोन सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये २० नागरिकांचाही बळी गेला आहे. यासोबतच या वर्षात केंद्रशासित प्रदेशात आठ ग्रेनेड हल्ले झाले आहेत. आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये १४६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून यामध्ये ४१ नागरिकांना आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागला होता. गेल्या वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण ६३ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 700 jammu and kashmir youths recruited in terrorist organizations in last 4 year dpj