१९४५ साली सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाइल कलाशनिकोव्ह यांनी एके-४७ निर्मिती केली. १९४७ साली ही बंदूक सोव्हिएत लष्कराने आजच्याच दिवशी या बंदूकीचा स्वीकार करुन तिचा वापर सुरु केला. त्या घटनेला आज ७१ वर्षे झाली. त्या निमित्तानेच ‘गाथा शस्त्रांची’ सदरामधील सचिन दिवाण यांचा एके-४७ ची माहिती सांगणारा हा लेख पुन:प्रकाशित करीत आहोत.
सामान्यत: मशिनगनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ७.६२ मिमी. व्यासाच्या गोळ्या मिनिटाला ६५०च्या वेगाने ५०० मीटर अंतरापर्यंत झाडणारी ‘एके-४७’ असॉल्ट रायफल ओळखली जाते ती तिच्या दमदार ‘पंच’साठी. किंग कोब्राने चावा घेतलेला माणूस जसा पाणी मागत नाही तसा ‘एके-४७’ची गोळी वर्मी लागलेला माणूसही वाचणे अवघड. साधी पण भक्कम रचना, हाताळण्यातील सुलभता, देखभाल व दुरुस्तीची अत्यंत कमी गरज आणि कोणत्याही वातावरणात हुकमी कामगिरी बजावण्याची हमी ही ‘एके-४७’ची वैशिष्टय़े. त्याच्या जोरावर जगभरच्या सेनादलांबरोबरच गनिमी योद्धय़ांच्या गळ्यातील ताईत बनलेली ‘एके-४७’ ही केवळ एक बंदूक न राहता तो एक ‘कल्ट’ बनला आहे. जगातील एकूण बंदुकांपैकी २० टक्के (म्हणजे पाचपैकी एक) बंदुका ‘एके-४७’ आहेत. आजवर ७५ दशलक्ष ‘एके-४७’ बनवल्या गेल्या आहेत. त्या मालिकेतील एके-७४, एके-१००, १०१, १०३ या बंदुका एकत्रित केल्या तर ही संख्या १०० दशलक्षच्या वर जाते. आफ्रिकेतील मोझांबिक या देशाच्या राष्ट्रध्वजावर ‘एके-४७’ची प्रतिमा आहे. इतकेच नव्हे तर ‘एके-४७’चे निर्माते मिखाइल कलाशनिकोव्ह यांचे रशियात पुतळे आहेत. कलाशनिकोव्ह नावाची व्होडकाही आहे.
सोव्हिएत युनियनच्या सैन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस १९४५ साली उत्तम बंदूक बनवण्याची स्पर्धा घेतली होती. त्या वेळी सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाइल कलाशनिकोव्ह यांनी सादर केलेल्या बंदुकीच्या डिझाइनला या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. १९४७ साली ही बंदूक सोव्हिएत लष्कराने स्वीकारली. ऑटोमॅटिक या इंग्रजी शब्दासाठीचा रशियन शब्द ‘आवटोमाट’साठी ‘ए’ हे आद्याक्षर, कलाशनिकोव्ह यांच्या नावातील ‘के’ आणि वापरात आलेल्या वर्षांतील ‘४७’ असे एकत्र करून ‘एके-४७’ हे नाव बनले आहे.
अमेरिकेने ‘एके-४७’च्या मुकाबल्यासाठी ‘एम-१६’ ही बंदूक तयार केली. पण ती ‘एके-४७’ इतकी प्रभावी ठरली नाही. ‘एम-१६’ गोळ्या झाडताना मध्येच जॅम व्हायची. त्यामुळे व्हिएतनाम युद्धात अनेक अमेरिकी सैनिकांनी प्रतिपक्षाच्या मृत रशियन सैनिकांच्या ‘एके-४७’ काढून घेऊन वापरल्या होत्या.
मात्र इतके यश लाभलेले मिखाइल कलाशनिकोव्ह रशियन लष्करातून लेफ्टनंट जनरलच्या हुद्दय़ावरून निवृत्त झाल्यानंतर साधारण ३०० डॉलर इतक्या तुटपुंजा निवृत्तिवेतनावर जगत होते. तेव्हा त्याच किमतीत आंतराष्ट्रीय बाजारात एक ‘एके-४७’ मिळायची. त्याउलट अमेरिकी ‘एम-१६’ बंदुकीचा निर्माता युजीन स्टोनर बंदुकीच्या डिझाइनसाठी मिळणाऱ्या रॉयल्टीवर धनाढय़ झाला होता. हा दोन्ही देशांच्या राजकीय विचारसरणींमधील आणि आर्थिक व्यवस्थांमधील फरक!
sachin.diwan@expressindia.com
(हा लेख ६ मार्च २०१८ रोजी ‘लोकसत्ता’मधील ‘गाथा शस्त्रांची’ सदरात प्रकाशित झाला होता)