पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजनेत जी बँक खाती सुरू करण्यात आली त्यापैकी ७४ टक्के खात्यात शून्य शिल्लक आहे, असे माहिती अधिकारात करण्यात आलेल्या अर्जावर देण्यात आलेल्या उत्तरात उघड झाले आहे.
आर्थिक सेवा विभागाने ७ नोव्हेंबर २०१४ रोजी दिलेल्या माहितीनुसार ७.१ कोटी बँक खात्यापैकी ५.३ कोटी खाती शून्य शिलकीसह उघडण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, की ७ नोव्हेंबरला या खात्यात ५४८२ कोटी रुपये जमा होते व त्यातील ४.२ कोटी खाती ग्रामीण भागात तर २.९ कोटी खाती शहरी भागात उघडण्यात आली होती. जास्तीत जास्त खाती स्टेट बँक ऑफ इंडियाने उघडली असून त्यांची संख्या १.२ कोटी होती. त्यापाठोपाठ बँक ऑफ बडोदाने ३८ लाख तर कॅनरा बँकेने ३७ लाख खाती उघडली होती. प्रधानमंत्री जनधन योजनेत लोकांना आर्थिक सक्षम करण्याचा व बचत शिकवण्याचा हेतू होता शिवाय पेन्शन, विमा, कर्ज या सुविधाही मिळू शकणार होत्या. त्यात खातेदाराला सहा महिन्यानंतर  ५ हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा आहे.

खात्यांचा तपशील
एकूण खाती : ७.१ कोटी
शून्य शिलकीची : ५.३ कोटी
ग्रामीण खाती : ४.२ कोटी
शहरी खाती : २.९ कोटी
बँकनिहाय उघडलेली खाती
स्टेट बँक ऑफ इंडिया : १.२ कोटी
बँक ऑफ बडोदा : ३८ लाख
कॅनरा बँक : ३ लाख

Story img Loader