पीटीआय, अथेन्स : स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक मासेमारी बोट ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुडाल्याने किमान ७८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या अपघातात अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 इटलीला जाणारी ही बोट पूर्व लिबयाच्या तोब्रुक भागातून प्रवासाला निघाल्याचे सांगितले जाते. इटालियन तटरक्षक दलाने मंगळवारी ग्रीक अधिकाऱ्यांना सर्वप्रथम या बोटीबाबत कळवले होते. स्थानिक तटरक्षक दलाच्या गस्ती पथकांना टाळण्यासाठी तस्कर ग्रीसच्या मुख्य किनाऱ्याजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय समुद्रात मोठय़ा बोटी नेण्याचे प्रमाण वाढले आहे.

 बोट बुडाल्यानंतर या भागात व्यापक शोध आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रीसच्या दक्षिणेकडील पेलोपोनेसे भागाच्या र्नैऋत्येला ७५ किलोमीटरवर घडलेल्या या घटनेनंतर १०४ लोकांना वाचवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ७८ मृतदेह हाती लागले असले, तरी अद्याप किती प्रवासी बेपत्ता आहेत हे निश्चित कळू शकलेले नाही.  तटरक्षक दलाच्या सहा नौका, नौदलाचे एक लढाऊ जहाज, लष्कराचे एक वाहतूक विमान, हवाई दलाचे  हेलिकॉप्टर, खासगी नौका शोधमोहिमेत सहभागी झाल्या.  आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 78 dead after migrant people boat sinking near greece ysh