पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात ७९ वर्षीय वृद्ध महिलेने आजारपणाला कंटाळून इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शालिनी भास्कर गाजरे (वय ७९) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या महिलेच्या मागे मुलगा, सुन आणि नातवंड आहेत. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, शालिनी गाजरे या आजीबाई अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, आजार आणि होणाऱ्या वेदना यामुळे त्यांनी रविवारी पहाटे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलत इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री त्या घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतू त्यांना सून आणि मुलाने आजारी असल्याने घराबाहेर येऊ दिले नाही. अखेर रविवारी पहाटे पाणी पिण्याच्या बहाण्याने त्या घराबाहेर आल्या, राहत्या सात मजली इमारतीचे टेरेस गाठत त्यांनी थेट खाली उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने संबंधित सोसायटीतील लोकांना दिल्यानंतर घटना समोर आली आहे.

Story img Loader