7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत पगार वाढ, महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. मार्च २०२३ मध्ये यामध्ये सुधारणा केल्याने होळीनंतर सरकारद्वारे या संबंधित अधिकृत घोषणा होऊ शकते असे म्हटले जात आहे. ८ मार्च पर्यंत महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमझ्ये सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे.
सध्या कॉमन फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के इतका आहे. उदाहरणासह सांगायचे झाल्यास सहाव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार, एखाद्या व्यक्तीला ४२०० ग्रेड पेमध्ये १५,५०० रुपये मिळतात. त्याला (रु. १५,५०० x २.५७) एकूण ३९,८३५ रुपये पगार मिळेल. त्याआधी ही टक्केवारी १.८६% इतकी होती. फिटमेंट फॅक्टरच्या गणितावरुन कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. केंद्र सरकारसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फिटमेंट फॅक्टरची टक्केवारी वाढवण्याची मागणी केली आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये २.५७ टक्क्यांऐवजी ३.६८ टक्क्यांचा वापर केला जावा असे त्यांनी म्हटले आहे. ही मागणी मान्य झाल्यास १८,००० रुपयांचे वेतन वाढून २६,००० रुपये इतके होईल.
सरकारद्वारे मार्च महिन्यात महागाई भत्ता (Dearness Allowance) ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्क्यांपर्यंत वाढवेल असे संकेत आहेत. पगार वाढ आणि महागाई भत्ता या संबंधित बदल वर्षाच्या सुरुवातीला लागू करण्यात आले आहेत. तसेच पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता व महागाई सवलत यांमध्ये वाढ होऊ शकते असेही म्हटले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांचा महागाई भत्त्यांची थकबाकी देखील या महिन्यामधील दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.