उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगानानी येथे बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, २७ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, UK 07 PA 8585 ही बस गुजरातमधील ३२ ते ३३ प्रवाशांना घेऊन उत्तरकाशीकडे निघाली होती. गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरून जाताना गंगानानी येथे ५० मीटर खोल दरीत बस कोसळली. यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २७ जण जखमी झाले आहेत. यातील १० जण गंभीर जखमी झाले आहेत.
याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव राधा रतुरी यांना दिले आहेत.