पाकिस्तान वायव्य सरहद्द प्रांतामधील आदिवासी भागात केलेल्या अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ तालिबानी दहशतवादी ठार झाले. वायव्य सरहद्द प्रांतामधील मीर अली गावातील तालिबानांच्या प्रशिक्षण केंद्राला अमेरिकेने लक्ष्य केले. हा अलीकडच्या काळात झालेला चौथा मोठा हल्ला आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेकडून हे प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येत होते. या शिबिरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अमेरिकेने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात तालिबानचे दोन वरिष्ठ कमांडरही ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान सरकारच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेने नवीन वर्षांत ड्रोन हल्ल्याची तीव्रता वाढविली आहे. यापूर्वी रविवारी दक्षिण वजिरास्तान भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात १६ दहशतवादी मारले गेले. या सर्व दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते, अशी शक्यता आहे. तर २ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला नझीर हा तालिबानी कमांडर मारला गेला होता.

Story img Loader