Parliament Winter Session 2023 Updates: बुधवारी लोकसभेमध्ये झालेल्या घुसखोरीच्या प्रकरणावरून सध्या देशात वातावरण तापलं आहे. विरोधकांनी यावरून मोदी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर संसदीय सचिवालयाने या सगळ्या घटनाक्रमामध्ये हयगय केल्याच्या आरोपाखाली तब्बल आठ लोकसभा कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. एकीकडे लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आलेली असताना आता लोकसभा कर्मचाऱ्यांवरील कारवाई चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं लोकसभेत?

बुधवारी लोकसभेचं कामकाज चालू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट लोकसभेत खासदार बसतात त्या ठिकाणी उड्या घेतल्या. हे तरुण वेगाने अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने जात असताना काही खासदारांनी त्यांची धरपकड केली. त्यातल्या एका तरुणाला खासदारांनी मारहाणही केली.दुसरीकडे संसदेच्या बाहेरही एक तरुण व एक महिला घोषणाबाजी देत होते. या चौघांनी स्मोक कँडल फोडून रंगीत धूर केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. आता या आरोपींची संख्या सहा झाली आहे.

कर्मचाऱ्यांवर दोष निश्चिती

एकीकडे आरोपींवर कारवाई होत असताना दुसरीकडे संसदेच्या सुरक्षेमध्ये कुचराई झाल्याची बाब विरोधकांनी लावून धरली आहे. यासंदर्भात कोण दोषी आहेत, त्यांच्यावर दोषनिश्चिती करणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी यावर निवेदन देणे या मागण्या विरोधी पक्षांनी जोरकसपणे लावून धरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता लोकसभा सचिवालयाकडून या घुसखोरीसाठी ज्यांचं दुर्लक्ष कारणीभूत ठरलं, अशा आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

लोकसभा घुसखोरी प्रकरणी राजनाथ सिंह यांचं निवेदन; म्हणाले, “कुणालाही पास देताना…!”

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावं एनडीटीव्हीनं दिली असून ती रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश अनिल, प्रदीप, विमित व नरेंद्र अशी असल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.

Parliament Attack: आरोपी सागर शर्मा दिल्लीला पोहचण्याआधी आईला म्हणाला होता, “मी आता….”

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे…

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावंही समोर आली आहेत. त्यानुसार पोलिसांनी आत्तापर्यंत लोकसभा घुसखोरी प्रकरणात सागर शर्मा, डी मनोरंजन, नीलम आझाद व अमोल शिंदे या चौघांना अटक केली आहे. याशिवाय ललित झा व विकी शर्मा अशा नावाच्या दोन इसमांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर यूएपीए कलमाखाली अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 loksabha workers suspended over parliament security breach case pmw